वास्तविक, सोमनाथनं चहा विकून स्वत: चं आयुष्य घडवलं. कठोर परिश्रम घेऊन, सीएची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक सुरु होते. त्याच्या यशाला अजून बळ दिलं, ते राज्य सरकारच्या 'कमवा आणि शिका!' या योजनेनं.
महाराष्ट्र सरकार तर्फे 2016 मध्ये सोमनाथला 'कमवा आणि शिका!' या योजनेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं. विनोद तावडे यांनी त्याच्या नावाची घोषणा अतिशय थाटामाटात केली.
लहानपणापासून गरिबीत दिवस काढलेल्या सोमनाथचे चांगले दिवस सुरु होते. पण 8 सप्टेंबर 2016 मध्ये त्याचा सोलापूरमध्ये अपघात झाला, आणि त्याचं आयुष्यच बदललं.
या अपघातात त्याच्या कमरे खालच्या भागाला अर्धांगवायूचा झटका आल्याने निकामी झाला. अनेक उपचार घेऊनही त्याचा गुण येत नसल्याने, त्याचं आयुष्य सध्या नैराश्येच्या गर्तेत सापडलं आहे. या अजारामुळे तो अक्षरश: अंथरुणाला खिळून आहे.
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला सध्या उपचारांसाठी महिना 35 हजारांची गरज आहे. सोमनाथच्या अपघातानंतर त्याच्या उपचाराची सर्व जबाबदारी राज्य सरकार करेल, असं अश्वासन दिलं होतं. पण उपचारासाठी त्याला अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नसल्याचं तो सांगतो.
त्याच्यावर उपचारासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. पण त्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटणार? या एकाच प्रश्नानं सोमनाथला ग्रासलं आहे.
राज्य सरकारने मदतीचं जे आश्वासन दिलं, ते नोकरीच्या स्वरुपात पूर्ण करावं अशी त्याची अपेक्षा आहे. पण अद्याप त्याच्याकडे पाहायला कोणत्याही सरकारी अधिकारी आणि विनोद तावडेंनाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्याच्यावर एकप्रकारे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.