शिर्डी : भारतीय नौदलातील अधिकारी ब्रिज मोहन शर्मा यांनी सिद्धिविनायक ते शिर्डी असा नॉनस्टॉप धाव घेतली. 43 तासात ब्रिज मोहन शर्मांनी सिद्धिविनायक ते शिर्डी हा 250 किलोमीटरचं अतंर पार केलं.


साई समाधी शताब्दी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानने वर्षभर विविध कार्यक्रमांच आयोजन केलं आहे. 11 फेब्रुवारी रोजी साईबाबा संस्थानच्या वतीने ‘रन फॉर साई’ या आंतर्राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देश विदेशातील खेळाडू तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा या करिता मुंबई येथील अॅथलिट आणि भारतीय नौदलातील अधिकारी ब्रिज मोहन शर्मा यांनी सिद्धीविनायक ते शिर्डी अशी नॉनस्टॉप धाव घेतली आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

ब्रिज शर्मा हे अॅथलिट आहेत. 2016 साली कॅलिफोर्निया येथे झालेल्या बॅडवॉटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सर्वात वेगवान खेळाडू ठरले होते. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले. शिर्डीमध्ये ‘रन फॉर साई’ या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात साईबाबा संस्थानसह ब्रिज शर्मा आणि त्यांचे सहकारी सामिल आहेत.

आज सकाळी ब्रिज शर्मा शिर्डीला पोहोचले. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व मॅरेथोर्नर्सच स्वागत केलं. या सर्वांनी साईंच्या नावाचा जयघोष करत साई समाधीच दर्शन घेतलं.

सचिन तेंडुलकरच्या भाषणाने आपण  प्रेरित झाल्याचं सांगताना ब्रिज शर्मा यांनी हा देश खेळप्रेमी देश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मॅरेथॉन स्पर्धेबरोबरच 3 किमीच्या साई दिंडीचं आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले असून या दिंडीत संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत. साईभक्तांनी यात सहभाग घेण्याचं आवाहन संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केलं आहे.