मुंबई : काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसेना उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर शिवसेनेची निवड का केली याबाबत माहिती दिली. चतुर्वेदी म्हणाल्या की, मी गेल्या 10 वर्षांपासून जी लढाई लढत आहे ती अद्याप सुरुच आहे. माझ्या लढाईचे जे मुद्दे होते तोच शिवसेनेचा अजेंडा आहे, त्यामुळे मी शिवसेनेत आले.


चतुर्वेदी म्हणाल्या की, देशातल्या मुला-मुलींची सुरक्षा, त्यांचे उत्तम भविष्य, तरुणांसाठी रोजगार, महिलांना सन्मान आणि शेतकऱ्यांचे हक्क यासाठी मी लढत आहे. हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. म्हणून मी शिवसेनेते आले आहे. जवळपास सर्वच पक्षात हे मुद्दे सारखेच असतात.

आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाने अभय दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तहलका, फर्स्टपोस्ट यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. बाल शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयांवर त्या कार्यरत आहेत. पुस्तकांची समीक्षा करणारा चतुर्वेदींचा ब्लॉग हा देशभरातील टॉप टेन वेबब्लॉग्जपैकी एक मानला जातो. मे 2013 मध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर असतात. रणदीप सुरजेवालांच्या नेतृत्वातील 'कम्युनिकेशन विभागा'च्या त्या सदस्या आहेत.