सोलापूर : निवडणुकीनंतर प्रचारामुळे कलुषित झालेल्या वातावरणाचा फायदा काही समाजकंटक घेत असतात. अशीच एक घटना माढा तालुक्यातील उपळवाटे गावात घडली आहे. शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर जाळपोळ आणि हाणामारीत झाले. आज दुपारी उपळवाटे येथे प्रहार संघटनेचे पदाधिकारी अतुल खूपसे यांच्या वस्तीवर जाऊन काही जणांनी जाळपोळ केली. तसेच तिथे राहणाऱ्या मजुरांना मारहाणही केली. हा सर्व प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आसल्याचा दावा खूपसे यांनी केला आहे.


लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाचा प्रचार केल्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वस्तीवर हल्ला केला असल्याचा आरोप खुपसे यांनी केला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून झाल्याचा दावा टेम्भूर्णी पोलिसांनी केला आहे. तसेच दोन्ही बाजूच्या फिर्यादी घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले आहे.

आज दुपारी तीनच्या सुमारास अतुल खूपसे यांच्या वस्तीवर काही गुंडानी येऊन जाळपोळ करत मजुरांना मारहाण केली. यात एका महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे आसपासच्या परिसरात राहणारे लोक घटनास्थळी जमू लागले. लोक आपल्याकडे येत आहेत, हे पाहताच मारहाण करणारे पळून गेले, अशी माहिती खूपसे यांनी दिली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली असून ही वादावादी शेतजमीन बळकावण्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे सांगितले. या हाणामारीचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संबंध नसल्याचा खुलासाही पोलिसांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे उपळवाटे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नेमका प्रकार पोलिसांनी शोधून काढावा अशी मागणी होत आहे.

VIDEO | शिर्डीतील सभेवेळी केंद्रीय नितीन गडकरींची तब्येत बिघडली