मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी परीक्षांचा गोंधळ अद्याप कायम आहे. दहावीस बारावी परीक्षांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, संपूर्ण देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे, आता बारावी परीक्षांचा देखील घेणार आहोत. परंतु एका राज्यात होत आहे, दुसर्‍या राज्यात नाही असे न करता एकसमान निर्णय घेतला जायला हवा. धोरण एक हवे. माननीय पंतप्रधानांना यापूर्वी देखील विनंती केली आहे, परत करणार आहे. शिक्षण क्षेत्राबाबत क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 


कोरोनामुक्त गाव मोहिम राबवायची गरज 


कोरोनाची रुग्णसंख्या शहरी भागात कमी होत आहे मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे गाव पातळीवर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी हे करुन दाखवलं आहे. घाटणे, तालुका मोहोळ गावचे ऋतुराज देशमुख, तर कोमल करपे, आंतळुली, दक्षिण सोलापूर या दोन तरुण संरपंचांनी आपलं गाव कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे. आपल्याला देखील आता कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 


ब्रेक दि चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, काय सुरु, काय बंद?



  • सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील. 

  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

  • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

  • दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

  • कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

  • कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते