कोल्हापूर : ‘सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एनडीएमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार सुरु आहे.’ असं वक्तव्य करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.


याचवेळी बोलताना चंद्रकात पाटील यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पाठराखण केली आहे. ‘सदाभाऊ खोत यांचं काम चांगलं आहे आणि ते सध्या मुख्यमंत्री कोट्यातून मंत्री आहेत.’ अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

'राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे'

दरम्यान, याचवेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या भाजप प्रवेशावरही बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवस सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

मात्र, असं असलं तरीही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. ‘सध्या चर्चा सुरू आहे पण त्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा नाही.’ असं ते यावेळी म्हणाले.