Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा रणसंग्रामाला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच जागावाटपांच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून जशी धुसफूस सुरू आहे, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपावरून काथ्याकूट सुरू आहे. मुख्यमंत्रीपदावरूनही दोन्हीकडे अजूनही एकमत झालेलं नाही.


शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदावर दावा!


दरम्यान महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून विशेष करून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर ठाकरे गटाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील आणि सत्ता आल्यास तेच पुन्हा एकदा राज्याची कमान सांभाळतील असं सातत्याने सांगितलं जात आहे. काल (12 ऑक्टोबर) पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा याची झलक दिसून आली. पहिल्यांदा संजय राऊत यांनी भाषण केल्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदावरती दावा केला, तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंत घेतलेली शपथ उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान दाखवण्यात आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली.





गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस वार्तांकन करणारे पत्रकार आदेश रावल यांनी लोकमत हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी केल्या होत्या. तसेच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याचा दावा आदेश रावल यांनी केला आहे.


राहुल गांधी महाराष्ट्रात कोणत्याही बदलाच्या तयारीत नाहीत 


राहुल गांधी सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये कोणताही निर्णय किंवा बदल करू इच्छित नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील असंच राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित केल्याचे त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून ही बाब जाहीरपणे सांगण्यात यावी आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. मात्र काँग्रेसला याला विरोध असल्याचा आदेश रावल यांनी म्हटले आहे. 


काँग्रेस नेते दिल्लीत पोहोचले


दरम्यान, राज्यामध्ये आज महायुद्ध महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत गद्दारांचा पंचनामा सादर करण्यात आला. यामध्ये महायुतीकडून घेण्यात आलेल्या निर्णयांवर हल्लाबोल करण्यात आला. या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे राज्यातील नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी जागावाटपाच्या अनुषंगाने असल्याचे बोलले जात आहे. जागावाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये सर्वाधिक चढाओढ आहे. ठाकरे गटाकडून 140 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे, तर काँग्रेस सुद्धा 130 जागांवर अडून आहे, तर शरद पवार गटाचा 80 जागांवर दावा आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत पोहोचल्याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या