ठाणे : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएम नगरसेवक शेख जफर शेख अख्तरला भिवंडी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ट्रक आणि डम्पर चोरी करुन ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे.
आरोपींकडून 50 ते 100 ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे एसीपी मुकुंद हातोटे यांनी दिली.
अनेक ग्राहकांची फसवणूक
नारपोली पोलीस स्टेशन येथे दाखल ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे आहे. सुरुवातीला बुलडाणा येथे चोरीच्या ट्रक, डम्पर यांचे नव्याने रजिस्ट्रेशन करुन ते विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बुलडाणा येथून पाच ट्रक जप्त करुन या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु करण्यात आला.
तपास सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसोबत गुजरातमधील चोरीला गेलेले असंख्य ट्रक आणि डम्पर हे नव्या बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करुन ते महाराष्ट्रातील विविध भागात विक्री केल्याचं समोर आलं.
आतापर्यंत आरटीओ कारकुनासह 13 जण ताब्यात
भिवंडी गुन्हे शाखेने तब्बल बारा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 22 ट्रक जप्त केले. या गुन्ह्यात आता राजकीय प्रस्थापित व्यक्तीही असल्याचं नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याच्या अटकेने स्पष्ट झालं. आता अटक झालेल्यांची संख्या 13 झाली असून त्यामध्ये नागपूर येथील एक आरटीओ कारकून आणि एका महिलेचाही समावेश आहे.
रॅकेट कसं समोर आलं?
भिवंडी गुन्हे शाखेकडून एक चोरीची बाईक ताब्यात घेण्यात आली होती. या बाईकच्या डिक्कीत ट्रकची कागदपत्रे आढळून आली, जी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातील होती. त्यामुळे तिथे संबंधित कागदपत्रांची खातरजमा केली असता ती बनावट असल्याचं निष्पन्न झालं. गुन्हे शाखेने नारपोली पोलीस स्टेशन येथे ट्रक चोरी संदर्भात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
या रॅकेटची पाळेमुळे बुलडाणा, नागपूरपर्यंत पसरली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागपूर ग्रामीण आरटीओ येथून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेल्या पाच ट्रकची माहिती मिळवली आणि तेथील दोन आरटीओ एजंटना ताब्यात घेतलं. पुढे तपासात नागपूर आरटीओ येथील कारकुनालाही ताब्यात घेतलं.
या टोळीने ट्रक आणि डम्परचे मूळ चेसीस नंबर आणि इंजिन नंबर नष्ट केले. बनावट नंबर टाकून त्यांची रंगरंगोटी केली आणि औरंगाबादचा एमआयएम नगरसेवक आणि त्याचा भाऊ या गाड्यांची विक्री करत होता, अशी माहिती समोर आली. या ट्रक आणि डम्परची ग्राहकांना फसवून विक्री केली जात होती.
चोरीच्या ट्रकची विक्री, औरंगाबादच्या एमआयएम नगरसेवकाला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2018 10:01 PM (IST)
ट्रक आणि डम्पर चोरी करुन ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -