कोल्हापूर: कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात चोरट्यांनी आज ५ बंद फ्लॅट फोडल्याची घटना घडली आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अपूर्व टॉवर आणि महारुद्र प्लाझा या अपार्टमेंटमध्ये दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली आहे.
चोरट्यांनी रोख रकमेसह घरातील सोन्या चांदीच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला आहे. राजारामपुरी परिसरात अनेक उच्चभ्रू लोक राहतात. या परिसरातील अपूर्व टॉवर आणि महारुद्र प्लाझा या दोन अपार्टमेंटमधील ५ बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी आज दुपारच्या सुमारास फोडले.
दुपारच्या वेळेला घरामध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप फोडून घरात प्रवेश केला. यामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे अमित शर्मा व प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. अतुल मेहता यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत