उस्मानाबाद : जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण सध्या देशात चर्चेचा विषय आहे. ही घटना ताजी असतानाच पोलिसांच्या असंवेदनशीलतेची घटना महाराष्ट्रात समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेला 18 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं.


वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी महिला गेली होती. ही महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही.

तपास अधिकारी दिवसभरात बदलत राहिले. शेवटी या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी कंटाळून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ही महिला निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं गेलं.

पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या महिलेच्या मूळ तक्रारीवर तब्बल पाच दिवसांनंतर आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या असंवेदनशीलतेचा संताप व्यक्त केला जात आहे.