Parivartan Mahashakti : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु असतानाच आज तिसऱ्या आघाडीने सुद्धा रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्यासाठी चाचपणी सुरू होती. त्याला आज मूर्त स्वरूप आलं आहे. पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिसरा पर्याय देण्याविषयी मंथन करण्यात आले.
बैठक पार पडल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेत बैठकीचा तपशील सांगितला. सुसंस्कृत महाराष्ट्राला तिसरा पर्याय देत असल्याचे सांगितले. बैठकीत तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिवर्तन मेळाव्यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं तोपर्यंत सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. परिवर्तन महाशक्तीमध्ये राज ठाकरे, मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल
राजू शेट्टी यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल. समन्वय समिती करू ते सर्व निर्णय घेईल. 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांना यात यायचे आहे त्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ चरित्र स्वच्छ चेहरा देण्याचं आमची कल्पना आहे, परिवर्तन महाशक्तीमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी यावे, असे त्यांनी सांगितले.
महायुती किंवा माविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का?
संभाजीराजे यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्ती या नावाने एक सुसंस्कृत महारष्ट्राला वेगळा पर्याय देत आहोत. राज्यातील जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे महारष्ट्रामध्ये परिवर्तन घडू शकतं. महायुती किंवा माविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. अजून आपण त्याच प्रश्नावर लढत आहोत. आज पक्षांची नावे बुद्रुक खूर्द अशी गावांच्या नावासारखी झाली आहेत.परिवर्तन महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा आहे, तिकडे ज्यांना यायचं त्यांनी यावे.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या