जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केला. तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांना खोचक टोला
खडसे परिवारात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? हे आपल्याला माहीत नसल्याची खोचक टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेला एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपणही पहिले शरद पवार यांच्याकडे होत्या आता अजित दादा पवार यांच्याकडे आहात. पहिले आपलं पाहावं, दुसऱ्याच्या घरात डोकाऊ नका, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर
यानंतर रुपाली चाकणकर यांनीही एकनाथ खडसे यांना उत्तर दिलंय. 1999 साली अजित पवार यांनी आपल्या सासूबाईंना उमेदवार दिली होती. तेव्हापासून आम्ही अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ सोबत आहोत. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा अभ्यास कमी पडत आहे. त्यांना अपुरी माहिती पुरविली आहे. खडसेंनी इतर ठिकाणी डोक घालू नये, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनीही एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर बोलताना राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका सत्ताधाऱ्यांवर केली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर घसरला आहे. त्यांनी विविध भाषणात केलेली वक्तव्य, महिलांच्याबाबत अश्लील वक्तव्य पाहिली तर ते लक्षात येते. खडसे यांच्याकडे बघण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरला असताना ते इतके मोठे नेते कसे झाले हा माझ्या पुढे प्रश्न आहे. खडसे माझ्यासाठी संपले आहेत. खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून खडसे यांची ओळख आहे. त्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या