Rajya Sabha Election 2022 : आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन आणि त्यांचे तीन, त्यांनी एक उमेदवार मागे घेतल्यास घोडेबाजार होणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देशात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक होत असून 10 जूनला मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील 6 जागांचा समावेश आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर बोलताना फडणवीस यांनी तिन्ही उमेदवारांच्या विजयाचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, जरी त्यांनी तिसरा उमेदवार ठेवला, तरी काही फरक पडणार नाही, आमचे उमेदवार निवडून येणार आहेत, ते महाराष्ट्रातील असून भाजपचे आहेत, राजकीय सक्रीय आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, सद्सद्वविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील, ज्या अर्थी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला आहे त्या अर्थी निश्चित आम्ही विचार केला आहे आणि निवडून आणू. 


दुसरीकडे, संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजप दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपने सहाव्या कोल्हापूरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 


विधानसभेतील संख्याबळ 


विधानसभेत भाजपचे 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेसचे 44 या संख्याबळानुसार भाजप 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे 2 सदस्य निवडून येऊ शकतात. शिवसेनेने संजय राऊत आणि कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपने राज्यसभेसाठी धनंजय महाडिकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे संभाजीराजेंऐवजी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले संजय पवार यांच्यासाठी आता कडवे आव्हान असेल. 


त्यामुळे आता धनंजय महाडिक आणि संजय पवार या कोल्हापूरच्या राजकीय पैलवानांची राज्यसभेच्या आखाड्यात कुस्ती होणार आहे. या कुस्तीत कोण मैदान मारणार याकडं राजकीय वर्तळाचं लक्ष लागलं आहे.


हे ही वाचलं का ?