Pune Fire : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरात हॉटेल तिरुमला भवन येथे मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट (Pune Fire)  झाल्याची घटना  (Pune Accident) घडली. काल मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. हडपसर अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन तातडीने दाखल झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


हॉटेलमध्ये लागलेली आग भीषण होती. त्यामुळे जवानांनी घटनास्थळी पोहोचताच किचनमधील स्फोट झालेला सिलेंडर बाहेर काढला. या सिलेंडरच्या शेजारी सहा सिलेंडर देखील होते. त्या सिंलेडरने पेट घेऊ नये म्हणून ते बाहेर फेकण्यात आले. होड पाईपचा वापर करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. किचनमध्ये अचानकपणे गॅस लिकेज झाल्याने मोठा स्फोट झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. सहा सिलेंडर तत्परतेने सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठा अनर्थ टळला. हॉटेलमधील टेबल, खुर्ची, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशन दलाच्या जवनांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे हॉटेल मालकाचं फार नुकसान झालं नाही. 


सिलेंडरच्या स्फोटांमध्ये वाढ
सध्या सिंलेडर लिक होऊन स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आठ दिवसांपूर्वी घरगुती सिलेंडरमधून वायू गळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली होती. पहाटे नऱ्हे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामध्ये ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत घरातील महिला जखमी झाली आहे. चैत्राली ईश्वर मांढरे असं 29 वर्षीय महिलेचं नाव होतं. पहाटे लागलेल्या या आगीमुळे कुटुंबियांची तारांबळ उडाली होती. अग्निशमन दलाला माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायू गळती असणारा सिलेंडर सुरुवातीला बाहेर काढला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने जवानांनी पाण्याचा मारा करत घरातील वस्तूंना लागलेली आग पसरु न देता पूर्ण विझवली त्यामुळे मोठा धोका टळला आहे. गॅसचा दुर्गंध सगळीकडे पसरला होता. या दुर्घटनेने घरातील लोक घाबरले होते. त्याच्या घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील इलेक्ट्रिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे कुटुंबियांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झालं होतं. सिलेंडरच्या स्फोटांमध्ये वाढ झाल्याने योग्य रित्या सिलेंडरचा वापर करा, असं आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.