Sugarcane price Agitation : सोलापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्यावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांचा मोर्चा धडकला. शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठेत ऊस गव्हाणीत बसूनच कारखाना बंद पाडला.

Continues below advertisement

आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता 2800 रुपये जाहीर केला होता. मात्र आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतर कारखानेही बंद पाडून शेतकऱ्यांना योग्य भाव घेण्यासाठी सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

8 डिसेंबरपासून शेतकरी नेते समाधान फाटेंचे वाखरीत आमरण उपोषण सुरु

ऊस दरावरुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साखर कारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 2800 ते 2850 जाहीर केला आहे. मात्र, शेजारील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दर हा 3500 ते 3600 रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जर 3 हजार 500 रुपयांचा दर देणं शक्य असेल तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानादरांना तेवढा दर देणं का शक्य नाही? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. कारखानदारांनी जर 3500 रुपये दर जाहीर करावा या मागणीसाठी 8 डिसेंबरपासून शेतकरी नेते समाधान फाटेसह इतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. अद्याप याची दखल घेतलेली नाही. समाधान फाटे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

शेजारील जिल्ह्यांमधे 3200 ते 3500 पहिला हफ्ता मिळत असताना सोलापूर जिल्ह्यात कमी दर का?

शेजारील जिल्ह्यांमधे 3200 ते 3500 पहिला हफ्ता मिळत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र 2800 ते 2850 पहिला हफ्ता जाहिर केला आहे. या कारखानदारांचा उघडपणे कितीही एकमेकाला विरोध असला तरी ऊस दर ठरवताना मात्र यांची एकी पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघायला मिळाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक, 8 तारखेपासून आमरण उपोषण