मुंबई: नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाचा प्रचंड गलथाणपणा समोर आला. अनेक ठिकाणी ढिसाळ नियोजनामुळे निकाल लांबल्याचं दिसून आलं. उस्मानाबादमुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं नसल्याने मतमोजणीला उशीर झाला, तर बीडमध्ये धिम्या गतीने मतमोजणी सुरु होती. सोलापूर आणि इंचलकरंजीतही अशाच समस्यांना सामोरे जावे लागले.


प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत असल्याने, मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असणे साहजिक असते. त्यामुळे निवडणूकीनंतर मतमोजणी केंद्रांवर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रंचड गर्दी असते. काही अपवाद वगळता, वेळेत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. मात्र निवडणूक आयोगाने या निकालासाठी प्रशिक्षित कर्मचारीच पुरवले नसल्याने मतमोजणी उस्मानाबादमध्ये उशिरा सुरु झाली.

बीडमध्ये संध्याकाळी सातपर्यंत मतमोजणीचं गुऱ्हाळ

तिकडे बीड नगरपालिकेची मतमोजणी सकाळपासून संध्याकाळी सातपर्यंत सुरु होती. इथेही प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव होता. ट्रेनिंग न मिळालेल्या कर्माचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मतमोजणी कशी करायची तेच त्यांना समजतं नव्हतं. पहिल्या 9 फेऱ्यांमध्ये फक्त 40 हजार मतांची मोजणी करणे मतमोजणी अधिकाऱ्यांना शक्य झाले.

करमाळ्यात कितीवेळा फेरमतमोजणी?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली. मात्र इथे शिवसेनेने आक्षेप घेतल्याने फेरमतमोजणी करण्यात आली. इथे फेरमतमोजणीला कार्यकर्त्यांचा आक्षेप नव्हता, तर मतमोजणीत गफलत झाल्याने दुसऱ्यांदा मतमोजणी करण्यात आली.

इचलकरंजी पालिकेची मतमोजणी कासवगतीने

महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश येणार की, स्थानिक आघाड्यांकडे सत्तेची सूत्रे जाणार याकडे अनेकजण देव पाण्यात ठेऊन होते. मात्र येथील मतमोजणी केंद्रांवर कासवगतीने मतमोजणी सुरु असल्याने रात्री साडेसातपर्यंत या नगरपालिकेचा निकालच जाहीर झाला नव्हता.