मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मालवणमध्ये धक्का बसला आहे. मालवणचा किल्ला शिवसेनेनं काबीज केला आहे. शिवसेनेचे उमेदवार महेश कांदळगावकर नगराध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. कर्तृत्वाऐवजी वशिल्यावर पदं देणं बंद होत नाही, तोपर्यंत यशाची अपेक्षा ठेवता येणार नाही' अशी टीका राणेंनी स्वपक्षावर केली.
मालवणमध्ये शिवसेनेला पाच, भाजपला पाच, काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सावंतवाडीत त्रिशंकू स्थिती झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
शिवसेनेला सात, काँग्रेसला आठ, भाजपला एक आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला आहे. मालवणध्ये शिवसेनेनं राणेंना धुळ चारली असली तर राणेंनी मात्र पराभवाचं खापर प्रदेश नेतृत्वावर फोडलं आहे. 'काँग्रेस कोणताच विषय गांभीर्याने घेऊन प्रतिकार करत नाही, सरकारविरोधात आंदोलन करत नाही. आँखो देखा हाल पाहत राहतात. काँग्रेसचे कार्यकर्ते तयार आहेत, पण नेते तयार
नसल्याने मुसंडी घेता येत नाही. कर्तृत्वावर पदं न देता वशिल्यावर पद देणं बंद होत नाही, तोपर्यंत यशाची अपेक्षा ठेवता येणार नाही' अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, देवगड नगरपालिका मात्र राणेंनी जिंकली आहे. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवलं आहे.