Maharashtra Political Crisis Eknath Shinde : शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात  शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्तेपदही असणार आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडात सामिल असलेले आमदारा आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 12 आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या 38 हून अधिक झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. हा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसोबत चर्चा करताना एक महाशक्तिचे पाठबळ असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता, राज्यात सत्ता स्थापन करण्याची हालचाल एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिष्टमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. आज दुपारी या बंडखोर आमदारांची बैठक होणार आहे. एकनाश शिंदे गटाच्या शिष्टमंडळात शंभूराज देसाई,दादा भुसे,भरत गोगावले, बच्चू कडू यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर, माध्यमांमध्ये व्यवस्थित भूमिका मांडण्यासाठी  प्रवक्तादेखील असणार आहे. 


आज होणाऱ्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेकडून होणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला कायदेशीर प्रत्युत्तर देण्यावर विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता नेमकं काय ठरवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. 


दरम्यान, शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16  आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेना विधीमंडळ पक्षाने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे.