Vijay Shivtare on Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज (12 जानेवारी) निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेतली. यावेळी देशमुख कुटुंबाचे सांत्वन करून या प्रकरणातील दोषी आरोपींवर कारवाईची मागणी शिवतारे यांनी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही फैरींवर फैरी झाडताना चुकीचा पायंडा मांडू नका, असे आवाहन केले. 


घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो 


विजय शिवतारे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी इथे असून परिस्थिती जाणून घेतली. इतक्या वाईट पद्धतीने निर्घृण हत्या कोणत्याही सरपंचाची झालेली नाही हे गंभीर प्रकरण असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत, स्वतः वकील असून त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो त्यामुळे तो किती शातिर आहे हे समजतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतील. 


अजितदादांना खोचक शब्दात टोला 


शिवतारे यांनी सांगितले की, अजितदादा परखड नेतृत्व आहे. मात्र, महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मीक कराडचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेल्या विषवल्लीचं त्यांना काही वाटत नाही, याचे शल्य आहे. ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार असल्याचे ते म्हणाले. 


दादांनी प्रखर भूमिका घ्यावी 


अख्खा महाराष्ट्र म्हणत आहे हे चुकीचं झालं आहे, त्यामुळे दादांनी प्रखर भूमिका घ्यावी चुकीचा पायंडा पाडू नये ही प्रामाणिक विनंती असल्याचे ते म्हणाले. दादा पोलीस ऑफिसर नाही, मी धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलणार नाही. ही विषवल्ली मोडण्याची भूमिका दादांनी घेतली पाहिजे, त्यांनी सर्वसामान्यांमध्ये येऊन बोलावं, मग त्यांना वास्तव माहीत पडेल, असे त्यांनी सांगितले. 


लोकांकडून ऐकलं ते भयावह 


पश्चिम बंगालमध्ये 1967 साली अशाच पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती आणि तोच बेस मला परळीत दिसून येत आहे. जे मी या ठिकाणी लोकांकडून ऐकलं ते भयावह असल्याचे त्यांनी सांगितले. गुंडाला कोणतीही जात नसते, साम्राज्यामागे तो लोकांना वापरून घेतो. काही लोक इथे येऊन ओबीसी लोकांवर अन्याय होतो हे बोलतात हे चुकीचे आहे. देशमुख यांची हत्या आणि त्यांच्या हत्यारांना फासावर लटकवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 


वाल्मीक कराड हाच मुख्य बेस, गुंडगिरी आणि पैसे वसुलीची केस 


शिवतारे यांनी वाल्मीक कराड हाच मुख्य बेस असल्याचा आरोप केला. हे प्रशासनाला कळत नसेल तर आश्चर्य असल्याचे ते म्हणाले. कोणताही व्यक्ती गुंडाला बोलणार नाही हे असं कर, त्यामुळे राजीनाम्याबाबत बोलणार नाही. ही गुंडगिरी आणि पैसे वसुलीची केस आहे याला राजकीय मुलामा शक्यतो लावू नये, असे ते म्हणाले. गृहमंत्री कडक माणूस आहे, त्यांच्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतात. याला जातीय रंग देऊ नका, असे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या