बुलडाणा : गेल्या कित्येक वर्षांपासून अनेकांच्या पसंतीची ठरलेली प्रसिद्ध 'शेगाव कचोरी' आज 68 वर्षांची झाली आहे. बदलत्या काळानुसार आपल्या कचोरीमध्ये वैविध्यपूर्ण बदल करणाऱ्या शेगाव कचोरीने आता 'मिक्सवेज कचोरी आणि चीज कचोरी' असे दोन नवे प्रकार ग्राहकांसाठी आणले आहेत.

1950 साली देशाच्या फाळणीनंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिरथराम शर्मा यांनी शेगाव येथे कचोरी सेंटर स्थापन केले होते. गेल्या 68 वर्षात ही कचोरी जगभरात पोहचली. सध्या करण शर्मा आणि लोहित शर्मा ही टी. आर. शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळते. स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या व्यवसायात ते काळानुरूप बदल करत आहे. या ठिकाणी पारंपारिक कचोरीसोबतच कचोरी सँडविच, मिक्सवेज कचोरी, स्पेशल जैन कचोरी, चीज कचोरीदेखील मिळते.

शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावी नेण्याचा मोह आवरू शकत नाहीत. लोणारचं सरोवर, जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड, गजानन महाराजांचं शेगाव यानंतर ही कचोरी आता बुलडाणा जिल्ह्याची नवी ओळख बनली आहे.

"शेगावची ही प्रसिद्ध कचोरी आम्ही विदेशात नेण्यात सफल झालो आहोत. विदेशात पाठविण्यासाठी खास बनवण्यात येणारी 'फ्रोजन कचोरी' तीन दिवस खराब होत नाही. तसेच ही कचोरी फ्रिजमध्ये ठेवली तर तीन महिन्यापर्यंत टिकते", असे शेगाव कचोरीचे मालक गगन शर्मा यांनी सांगितले.