जालना : राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC) मुद्दा अधिक गरम आहे. एकीकडे राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यावर जोर दिल्याचं दिसून येत आहे. तर, ओसीबी आरक्षण बचाव मोहिमेंतर्गत उपोषणाला बसलेल्या नेत्यांवरही जरांगेंनी त्यांच्या स्टाईलने हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, जरांगे विरुद्ध ओसीबी नेते असा काहीसा सामना रंगला आहे. त्यातच, जरांगे यांच्या मूळ गावी झालेली दगडफेकीची घटनाही ताजीच आहे. आता, मनोज जरांगे सध्या वास्तव्यास असलेल्या रुमवर ड्रोन (Drone) फिरत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावरुन, आता ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. मनोज जरांगे यांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील आकाशात ड्रोन फिरताना दिसून आला आहे. सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे राहत असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता. जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला होता. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी या घटनेमुळे मराठा आंदोलक काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी हा ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांनी केला असेल, असे विधान केले आहे.  


ड्रोन कॅमेराचा खोडसाळपणा जरांगेच्याच लोकांनी केला असेल, ड्रोन दिशाभूल करुन पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रोग्राम असू शकतो, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे. जरांगेंना भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घेतलं पाहिजे, आमचा त्याला विरोध नाही असेही वाघमारे यांनी म्हटलं. तसेच, शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली नक्की भूमिका काय आहे, असे जाहीर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. कारण, त्यांचे नेते राजेश टोपे सभागृहात सगे सोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी करत असल्याने ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे का? असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.


अधिवेशनातही आला ड्रोनचा मुद्दा


विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या घराभोवती ड्र्रोनचा फेरफटका झाल्याच्या मुद्द्यावरुन आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. अंतरवली सराटी गावची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी सुरु आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्यामागे कोण आहे? अंतरवाली सराटी हे गाव मराठा आरक्षण आंदोलनासाठी ओळखले जाते. त्यामुळे याप्रकरणात आवश्यक असल्यास संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गरज भासल्यास मनोज जरांगे यांना संरक्षण द्यावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.


गृह राज्यमंत्र्‍यांनीही घेतली दखल


राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घराबाहेर फिरणाऱ्या ड्रोनबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल दिला जाईल. जरांगे पाटील यांना याआधी हत्यारी संरक्षण दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांसबोत बोलून अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास ते दिले जाईल, असे आश्वासनही मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात उत्तरादाखल बोलताना दिले.