Ashok Pawar on Ajit Pawar: कारखान्यासाठी कर्ज डावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांनी (Ashok Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. 


मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली.  केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.


दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


मी शरद पवारांसोबत राहिलो म्हणून अन्याय


"विकासाच्या नावाखाली तुम्ही सतत पक्ष बदलणार असाल आणि केवळ मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणारा असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही मी कारखान्याचा प्रमुख असलो तरी त्याचा सभासद शेतकरी आहेत. 25 मे ट्रॅक्टर ऊस सध्या पडून आहे. त्यांची नाराजी सरकार विरोधात वाढल्याशिवाय राहणार नाही. अशी अडवणूक होत असेल तर आंदोलन करू,"असा इशाराही त्यांनी दिला. 


केवळ विरोधी आहे म्हणून निधी दिला जात नाही -अशोक पवार 


"केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी आहे. आता आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत नाही म्हणून मलाही निधी दिला गेला नाही. अशोक पवार, राहुल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी कारखाना हा शेतकऱ्यांचा असतो. त्यांना मदत होणं गरजेचं आहे. अशाप्रकारे अडवणूक करणे योग्य नाही," असे अशोक पवार म्हणाले. 


मकरंद पाटील शरद पवार यांच्यासोबत होते त्यावेळी त्यांच्या कारखान्यांना पैसे दिले नाहीत आता अजित पवार यांच्यासोबत आल्यानंतर त्यांना तब्बल 500 कोटी रुपये दिले आहेत. नवाब मलिक आता त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यावर ते बोलणार नाहीत, असेही अशोक पवारांनी सांगितले.