अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज गुरुवारपासून सुनावणी सुरु होणार आहे. गेल्या सुनावणीत आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे गैरहजर राहिल्यानं 26 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती.


जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे. खटल्याचं कामकाज 26 ते 29 तारखेपर्यंत शनिवारी आणि रविवारीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोपर्डी खटल्याचा अंतिम युक्तिवाद ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होऊन डिसेंबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे.

कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रथम युक्तिवाद करतील. घटनाक्रम, साक्षीदार, पोलीस तपास आरोपत्र, वैद्यकीय अहवालानुसार आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर मुख्य आरोपींसह तीनही आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत अंतिम युक्तिवाद होऊन डिसेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

कोपर्डीत जुलै 2016 साली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं राज्य ढवळून निघालं होतं. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात लाखोंचे मूक मोर्चे निघाले होते. त्यानंतर जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे.