नवी दिल्ली : राज्यात सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेना-भाजपचं भांडण महाराष्ट्राला नवीन नाही. पण आता याची झलक राजधानी दिल्लीतही पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे उद्या सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या धोरणांमुळे रिजनल कनेक्टिव्हिटीच्या उडान योजनेत नाशिक आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणांवर अन्याय होत असल्याचा गोडसेंचा आरोप आहे.

मुंबई विमानतळावर एअरपोर्ट टाईम स्लॉटच्या वाटपात महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, सोलापूर या मार्गांबाबत परवानग्या मुद्दाम रखडवल्या जात आहेत. त्याऐवजी गुजरातमधल्या सुरत, कांडला, पोरबंदर या एअरपोर्टसाठी मात्र टाईम स्लॉट तातडीने दिले जातात असा, त्यांचा आरोप आहे.

गुजरात राज्यातल्या तीन ठिकाणांना एअरपोर्ट स्लॉटची मान्यता देऊन महाराष्ट्राची विमान सेवा जीव्हीके कंपनीने महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचं खासदार हेमंत गोडसेंचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावर उद्या सकाळी 11 वाजता ते शिवसैनिकांना घेऊन दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाच्या कार्यालयावर धडकणार आहेत.