नांदेड : राज्यपालांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांनी अघोषित बहिष्कार घातला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. यामुळे राज्यपालांचा आजपासून सुरु होत असलेल्या दौऱ्यावरील वादाचं मळभ आणखी गडद होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यामध्ये तिनही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची गैरहजेरी असेल अशी चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 


नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं जंगी स्वागत करण्यात आलं. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी विपीन इटनकर  यांच्यासह विद्यापीठातील सर्वच अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, "माझा स्वभावच असा आहे की, मी फिल्ड वरून जाऊन पाहणी करतो. फिल्डवर गेल्याने शिकायला मिळतं. मात्र मध्येच कोविड आला आणि त्यामुळे जाणं-येणंच बंद झालं. मी महाराष्ट्राचा राज्यपाल नसतो झालो तरी, नांदेडचे गुरू गोविंदसिंग, छत्रपती शिवराय माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. म्हणून मला नेहमी नांदेडला जावं असं वाटत होतं."


"आज आपण सर्वजण नवीन भारतात आहोत. आज सगळ्यांनी नवीन शिक्षण पॉलिसी केली आहे. आमचे प्रधानमंत्री सर्वच योजनांची गंभीरतेनं अंमलबजावणी करत आहेत. सर्वच शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक जे काम करताहेत, ते गौरवास्पद आहे. पाणी संवर्धनासाठी ही विद्यापिठं झटत आहेत. हे ही मोठं काम आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर सध्या सर्वजण करत आहेत, ती चांगली बाब आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीत करण्याचं म्हटलं जात होतं. मातृभाषेबाबत अभिमान असावा आणि आपल्या राष्ट्रभाषेचाही वापर व्हावा. देशात अनेक ठिकाणी हिंदी बोलली जाते. हिंदी देशात स्वाभाविक दृष्टीनं विकसित झाली आहे. मराठी ही महाराष्ट्रात विकसित झाली पाहिजे. सर्वांनी शिक्षण आणि इतर बाबतीत मराठी वाढवली पाहीजे.", असं राज्यपाल म्हणाले. पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, "राजकारण्यांचं काम फक्त टीका करणं नाही, काहितरी देशाच्या प्रति केलं पाहिजे" 


नांदेड येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे  उदघाटन न करताच  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा ताफा विद्यापीठाबाहेर गेला. नांदेड येथील अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहावरून राज्यात राज्य सरकार आणि राज्यपाल असा वादंग निर्माण झाला होता. परंतु, आज स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून राज्यपाल वसतिगृहाच्या उद्घाटन स्थळी येणार होते. परंतु हा उद्घाटन कार्यक्रम न करताच राज्यपालांचा ताफा दुसरीकडे वळाला. त्यामुळे अल्पसंख्याक वसतिगृहाचे उद्घाट न करताच राज्यपाल पुढे निघून गेल्यामुळे या अल्पसंख्याक वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपालच करणार की, उद्घाटन होणारच नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार आता राज्यपाल तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बैठका घेणार नाहीत. राज्य सरकारनं राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतल्यानंतर कोश्यारींच्या मराठवाडा दौऱ्यातील कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल तीनही जिल्हाधिकाऱ्यांना विश्रामगृहावर बोलावूनच त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, राज्य सरकार विरुद्धच्या वादात राज्यपालांनी काहीशी माघार घेतल्याचं दिसंतय. हा दौरा म्हणजे, राज्यपाल घटनेची चौकट मोडून हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राज्य सरकारनं केला होता.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर, कसा असेल दौरा?


5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यपाल नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. पूर्व नियोजित दौऱ्यानुसार तिनही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेणार होते. यावर मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्यानंतर नियोजनात बदल करण्यात आला आहे.



  • सकाळी 10 वाजता नांदेड येथे आगमन, सकाळी 10.30 वाजता नांदेड विद्यापीठात दृकश्राव्य सादरीकरणासाठी राखीव

  • सकाळी 10.45 वाजता विद्यापीठ परिसरातील पावसाच्या पाण्याच्या पूनर्भरण उपक्रमाच्या पाहणीसाठी

  • सकाळी 10.47 वाजता विद्यापीठातील विविध पूनर्भरण  उपक्रमांच्या ठिकाणी भेट

  • सकाळी 11.10 वाजता विद्यापीठातील जल पूनर्भरण उपक्रमांची पाहणी

  • सकाळी 11.17 वाजता अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन

  • सकाळी 11.19 वाजता विद्यापीठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन

  • सकाळी 11.26 वाजता विद्यापीठातील बॉटनिकल आणि बायोडायर्व्हसिटी पार्ककडे प्रस्थान

  • दुपारी 2 वाजेपर्यंत राखीव वेळ, दुपारी 2.15 वाजता तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथील प्रशासकिय प्रमुखांसमवेत बैठक