नागपुरातील शिवसेनेच्या प्रचारवाहनाच्या चालकाकडे परवानाच नाही
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 03:03 PM (IST)
नागपूर : नागपूरच्या वनदेवीनगरमध्ये झालेल्या अपघातातील कारचालक गौरव बोरकरकडे वाहनचालक परवानाच नसल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री शिवसेनेचं प्रचार वाहन थेट झोपडीत शिरल्यानं एक महिला आणि चिमुरडीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातला आरोपी कारचालक गौरव बोरकर याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सच नाही. त्यामुळे त्याच्या हाती कार सोपवलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. 19 वर्षीय गौरव बोरकर सध्या अटकेत असून शिवसेना नेते बंडू तळवेकर यांचा तो कार्यकर्ता आहे. शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा तळवेकर यांच्या प्रचारावेळी मारुती 800 कार ताज मोहम्मद यांच्या झोपडीत शिरल्यानं ताज यांची वृद्ध आई इस्लाम बी आणि सहा महिन्यांची मुलगी आसिया यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले. घटनेच्या वेळी कार्यकर्ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.