मुंबई: ‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला असून आज (22 मार्च) रात्री 8 वाजता डॉक्टर कामावर रुजू होणार असल्याचं आश्वासन 'मार्ड'नं मला दिलं आहे.’ असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
‘राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे’
‘राज्यभरातील निवासी डॉक्टर मागील तीन दिवसांपासून संपावर होते. पण आज हा संप मागे घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आज माझ्याशी याबाबत चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्याही त्यांनी माझ्यासमोर मांडल्या. त्यांच्या सगळ्या मागण्या मी मान्य केल्या आहेत. त्यांची सुरक्षेविषयीची प्रमुख मागणी आणि इतर मागण्याही आम्ही मान्य केल्या आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आपण संप मागे घेत असल्याचं मला सांगितलं.’ अशी माहिती महाजन यांनी दिली.
‘16 वैद्यकीय महाविद्यालयात 1100 सुरक्षा रक्षक नेमणार’
‘16 वैद्यकीय महाविद्यालयात 15 दिवसाच्या आत 1100 सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येतील. यासाठी 23 कोटी खर्च अपेक्षित असून याला मान्यताही देण्यात आली आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक 21-25 वयोगटातील असतील. तसेच त्यांना योग्य प्रशिक्षणही दिलेलं असेल.’ अशी माहिती महाजन यांनी दिली.
'...तर डॉक्टरांना परिणामांना सामोरं जावं लागेल'
‘सुरक्षा रक्षकांच्या मागणीसह इतर मागण्यांवरही डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी माझी सखोल चर्चा झाली. त्यांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या. त्यानंतरत्यांनी त्यांनी मला सांगितलं की, आज रात्री 8 वाजता सर्व डॉक्टर कामावर रुजू होतील. मात्र, यानंतरही जर डॉक्टर कामावर रुजू झाले नाही तर मात्र, त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.’ असं महाजन म्हणाले,
दरम्यान, गिरीश महाजन यांनी आज संपकरी डॉक्टरांना अल्टिमेटम दिला होता. रात्री 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा नाहीतर, कायदेशीर कारवाई करण्यात येईल
न्यायालयाने डॉक्टरांना खडसावलं
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आहे, असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लोळ यांनी नोंदवलं.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा
संबंधित बातम्या
आज रात्री 8 पर्यंत रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू : सरकार
नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित
हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती