बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यात मतदारांनी राष्ट्रवादीला स्पष्ट कौल दिला असतानाही पराभवाचा सामना करावा लागला, हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रिपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल. अशा पक्षविरोधी कारवाया कदापि सहन केल्या जाणार नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं.
काय आहे वाद?
बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. विश्वासघातकी व्यक्तींमुळे बीड झेडपी राष्ट्रवादीच्या हातातून गेली, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
कमी जागा मिळालेल्या असताना भाजपने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. 34 मतांसह भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 25 मतं मिळाली.