Gondia News गोंदिया : स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत गोंदिया जिल्हा (Gondia News) नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. जिल्हा निर्मितीनंतर महादेवराव शिवणकर आणि राजकुमार बडोले वगळता आतापर्यंत इतर जिल्ह्यातील नेतेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. तर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत साडेचार वर्षांच्या काळात गोंदिया जिल्ह्याला पाच पालकमंत्री मिळाले. हे पाचही पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील असून या पालकमंत्र्यांनी फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे अशा महत्त्वाच्या सणाला झेंडावंदन करीताच गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली.
नुकताच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडत असल्याचे एबीपी माझा शी बोलताना सांगितले होते. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळणार आहे. मात्र, अशातच नागरिकांनी आता गोंदिया जिल्ह्याला खूप दूरचा पालकमंत्री नको, तर आजूबाजूच्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री हवा आणि काम करणारा पालकमंत्री हवा फक्त झेंडा मंत्री नको, अशी मागणी गोंदियाकरांनी केली आहे.
अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री
अदिती तटकरे (Aditi Tatkare) या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार, अशी विश्वसनीय माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. धर्माराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेत गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचंही त्यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं आहे. अशातच आता गोंदियाकरांची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्रि पद सोडणार असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे, असं देखील सांगितलं. गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गानं करणं वारंवार शक्य होत नाही, असंही आत्राम म्हणाले आहेत.
हे आहेत गोंदिया जिल्ह्याचे शेवटचे 5 पालकमंत्री
1) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी ) गडचिरोली जिल्हा..
2) सुधीर मुनगंटीवर (भाजप) चंद्रपूर जिल्हा..
3) प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) अहमदनगर जिल्हा
4) नवाब मलिक (राष्ट्रवादी) मुंबई
5) अनिल देशमुख (राष्ट्रवादी) नागपुर
इतर महत्वाच्या बातम्या