sugar factory in kolhapur : एकरकमी एफआरपीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात (sugarcane frp maharashtra) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून उच्चांकी पहिली उचल बिद्री कारखान्याने दिली आहे. साखर कारखाना यंदाच्या गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3209 रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडून पहिली उचल जाहीर 3 हजार रुपये जाहीर करण्यात आली होती. तत्पूर्वी, हसन मुश्रीफ यांनी एकरकमी पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, दर जाहीर केला नव्हता. तथापि, कागल तालुक्यातील तिन्ही कारखान्याकडून पहिली उचल प्रत्येकी तीन हजार जाहीर करण्यात आली आहे. 


हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना पहिली उचल तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे. कारखान्याने सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे. श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याने गळीतासाठी येणाऱ्या ऊसासाठी पहिली उचल 3 हजार देण्याचे जाहीर केले आहे.  कारखान्याने 11 लाख टन गाळप करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना ऊस दर प्रति टन 3000 रुपयांप्रमाणे एकरकमी देणार आहे. कारखान्याने हंगामात 9 लाख टन गाळपाचे लक्ष आहे. 


वारणा दोन दिवसात दर जाहीर करणार 


दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या कारखान्यांकडून अजून पहिली उचल (sugarcane frp maharashtra) जाहीर करण्यात आलेली नाही, तसेच एफआरपीच्या कमी पहिली उचल जाहीर केली आहे त्या कारखान्यांविरोधात अजूनही आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, जय शिवराय त्याचबरोबर आंदोलन अंकुशकडून विविध कारखान्यांसमोर आंदोलन सुरू आहेत.


वारणा कारखान्याने दोन दिवसांमध्ये पहिली उचल जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये आंदोलन चांगलेच पेटले आहे. आंदोलन अंकुश कडून शिरोळमधील शरद साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय, जयसिंगपूर पंचगंगा कारखान्याचे गट ऑफिस आणि दानोळी येथील जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयास कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. कार्यकर्त्यांनी घोडावत खांडसरीलाही भेट दिली. यावेळी 2900 रुपये जाहीर केलेला दर  अमान्य करत किमान 3000 रुपये जाहीर करावा मगच ऊस तोडणी करावा अन्यथा कारखाना बंद करावा अशी मागणी केली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात 17 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु  


दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 17 कारखान्यांमध्ये गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस लांबल्याने आणि तसेच शिवारामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड लांबली. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने धुराडी पेटण्यास सुरुवात झाली आहे. 


यावर्षीच्या हंगामासाठी 10.25 रिकव्हरीला प्रति टन 3 हजार 50 रुपये दर निश्चित केला गेला आहे. यापेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर संबंधित कारखान्याने तो जाहीर करून हंगाम सुरू करण्यास सूचना साखर आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. हंगाम संपल्यानंतर शेवटी मिळणार्‍या उताऱ्याच्या आधारावर उर्वरित रक्कम द्यायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 सहकारी कारखाने व खासगी पाच गाळप परवाना मिळाला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या कारखान्याकडून किती दर 



  • बिद्रीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील उच्चांकी 3209 प्रतिटन

  • डी. वाय. पाटील साखर कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • संताजी घोरपडे कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • मंडलिक कारखाना हमिदवाडा 3 हजार रुपये प्रतिटन

  • शाहू कारखाना 3 हजार रुपये प्रतिटन

  • अन्नपूर्णा कारखाना केनवडे 2921रुपये प्रतिटन 

  • दालमिया भारत शुगर 3016 रुपये 

  • वारणा कारखाना दोन दिवसात जाहीर करण्यात येणार 


इतर महत्वाच्या बातम्या