यवतमाळ : गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्यात यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावचे वीर जवान अग्रमन रहाटे शहीद झाले असून आज त्यांच्या गावात गावकऱ्यांनी त्याना श्रद्धांजली वाहिली. तसेच गावात कडकडीत बंद पाळून सरकारने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे अशा भावना गावकरी आणि रहाटे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.




गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात आर्णी तालुक्यातील तरोडा येथील वीर जवान अग्रमन रहाटे हे शहीद झाले. त्यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात आज ग्रामपंचायतीच्या पटांगणावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वाचा : काल स्फोट, आज धमकी; नक्षलवाद्यांची गडचिरोलीत बॅनरबाजी

गावातील कोणत्याही गावकऱ्याने अथवा नातेवाईकाने अग्रमण शाहीद झाल्याची माहिती अद्याप त्याच्या आईला दिलेली नाही. दोन दिवसांपूर्वी अग्रमणच्या मामाचे निधन झाले आहे. अग्रमणची आई अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही, अशा परिस्थितीत अग्रमण शहीद झाल्याची बातमी त्याच्या आईला सांगण्याची कोणाचीच हिंम्मत झालेली नाही.

भाऊ गेल्याच्या धक्क्यात असलेल्या अग्रमणच्या आईला जर तिचा मुलगा शहीद झाल्याचे समजले तर ते तिच्यासाठी धोक्याचे ठरु शकते, त्यामुळे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी अग्रमण गेल्याची माहीती त्याच्या आईला दिलेली नाही.

सहा वर्षांपूर्वी अग्रमन रहाटे हे गडचिरोली पोलीस दलात दाखल झाले होते. नक्षलवादीविरोधी कारवाई करत असताना महाराष्ट्रदिनी त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे.