सोलापूर : सोलापुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपलीय. सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा सध्या सोलापुरात सुरु आहेत. मात्र ही नियुक्ती होण्याआधीच पालिकेचे उपमहापौर असलेले राजेश काळे आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या नियुक्तीच्या चर्चेवरुन नगरसेवक सुरेश पाटील यांनी विरोध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहलं आहे. तर पक्षाला विचारात न घेता पत्रकबाजी करणाऱ्या सुरेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर राजेश काळे यांनी केली आहे.
सोलापुरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता आधीचे पालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली. त्यांच्याजागी वखार महामंडाळाचे संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासन अधिकाऱी असलेल्या पंकज जावळे यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर या अधिकाऱ्यांच्या मदतीला आणखी एका अनुभवी अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी अशी मागणी वारंवार जोर धरतेय. त्यातच याआधी सोलापुरात उपायुक्त म्हणून बराच काळ काम केलेले त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
याच चर्चेला लक्षात घेत नियुक्ती होण्यापूर्वीच नगरसेवक सुरेश पाटील यांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. ढेंगळे पाटील हे वादग्रस्त आहेत. त्यांच्या कामाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. तसेच सोलापुरात त्यांनी नियुक्ती देऊ नये असे पत्र सुरेश पाटील यांनी लिहले. हे पत्र व्हॉट्सअॅपवर वायरल होताच उपमहापौर राजेश काळे यांनी सुरेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. सुरेश पाटील हे फक्त भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी हे पत्र पाठवण्यापुर्वी महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चा केली नाही. हे पक्षाचे मत नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे. असं म्हणत टीका केली. तर जो अधिकारी सुरेश पाटील यांना पैसे देत नाही तो त्यांच्या लेखी भ्रष्ट असतो. पालिकेचा कारभार असे भ्रष्ट लोक चालवणार आहेत का? ढेंगळे-पाटील शहराच्या भल्यासाठी येणार आहेत. त्यांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
तर मनपा आयुक्तांविरोधात प्रस्ताव दिल्याने सभागृहाने मला कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र पक्षाला विचारत न घेता पत्रव्यवहार करणाऱ्या नगरसेवक सुरेश पाटील यांना पक्ष नोटीस देणार का हे मी पाहणार आहे. उपमहापौरावर कारवाई केली जाती मग नगरसेवकाबद्दल पक्ष काय भूमिका घेणार हे सुद्धा बघणार, असल्याचे म्हणत पक्षाला मैदानात ओढले आहे.
दरम्यान, 'दीड वर्षांपूर्वी जेव्हा आपण ढेंगळे-पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती तेव्हा राजेश काळे हे आपल्या सोबत होते. मात्र आज ते ढेंगळे पाटील यांची बाजू घेत असून भ्रष्ट कोण आहे हे सर्वांना समजते. मी पक्षाचा ज्येष्ठ नगरसेवक आहे तर राजेश काळे हे आता उपमहापौर झाले आहेत. त्यामुळे काळे यांनी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये' ,असे प्रतिउत्तर सुरेश पाटील यांनी दिले आहे. तर पक्षाने पत्राबाबत विचारणा केली तर आपण उत्तर देऊ असे देखील स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवक आणि उपमहापौरांमध्ये अधिकाऱ्याच्या नियुक्ती आधीच वाद रंगताना पाहायला मिळत आहे.