काम : शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणे
पगार : केवळ दीड हजार रुपये महिना
याच बबिताताईंनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये तब्बल एक कोटी रुपये जिंकले आहेत. अमरावती जिल्ह्यातलं अंजनगाव सुर्जी हे त्यांचं गाव. शाळेत मुलांसाठी खिचडी शिजवण्याचं काम त्या करतात. हे काम करता करता त्यांनी जी झेप घेतलीय ती शब्दांपलिकडची आहे.
बबिता ताडे यांचे पती सुभाष ताडे गेल्या 23 वर्षापासून पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात. संसाराला हातभार लावण्यासाठी बबिताताई सुद्धा याच शाळेत खिचडी शिजवण्याचं काम करतात. बबिता या पदवीधर असून पदव्युत्तरचे एक वर्षाचंही शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. काही दिवस स्पर्धा परीक्षाही दिल्या, परंतु कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता अभ्यासाची जागा संसाराने घेतली.
बबिता ताडे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला तर मुलगा अंजनगाव इथेच शिक्षण घेत आहे. बबिताईंना वाचनाची आवड असल्याने त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न केला. अकराव्या सीझनमध्ये सुरुवातीला 32 लाख इच्छुक आले होते. त्यापैकी 4 हजार 800 स्पर्धक पात्र ठरले. ऑडिशनसाठी एकविसशे स्पर्धक पात्र ठरले, त्यामधून बबिताताई हॉट सीटवर आल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कुणीतरी 'केबीसी'मध्ये एक कोटी रुपये जिंकल्याची चर्चा होती. परंतु त्यांनी आतापर्यंत कोणालाही ही गोष्ट सांगितली नव्हती. फक्त 'कौन बनेगा करोडपती'मध्ये गेले होते, एवढीच गोष्ट चर्चेत होती. परंतु आज प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर सोनी टीव्हीची अमिताभ बच्चन आणि बबिताताईंची एक कोटी रुपये जिंकल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.
बबिताईंना जे यश मिळालंय त्यामागे आहे त्यांची मेहनत. शिक्षणाप्रतीची आस आणि ध्यास. वाचन हा त्यांचा सगळ्यात मोठा छंद. तोच छंद त्यांना करोडपतीपर्यंत घेऊन आला आहे. जे जगतो ते नशिब नसतं जे घडवतो ते नशिब असतं. बबिताताईंनी तेच घडवलं आहे. जिद्दीच्या विश्वासाच्या आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जिवावर त्या करोडपती ठरल्या आहेत. तब्बल एक कोटी रुपये जिंकणाऱ्या करोडपती. केबीसीचा हा भाग 18 आणि 19 सप्टेंबर रोजी प्रसारित होणार आहे.