ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारगृहातील आरोपीनं थेट पोलिसांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कैदी अरमान शेख यानं वाटी कापून त्याचं धारदार शस्त्र बनवत पोलिसांवर हल्ला केला.


या हल्ल्यात कॉन्स्टेबल सुभाष राबडे आणि पिसे नावाचे पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. राबडे यांच्या कान आणि डोक्यावर अरमानने वार केले. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आरोपी अरमाननं स्वत:लाही इजा करण्याचा प्रयत्न केला.

योग्य ती सेवा न दिल्यामुळे आणि तारखेला बाहेर काढत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत अरमानने हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.

आरोपी अरमानवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल असून त्याला मोक्काही लागला आहे. विशेष म्हणजे आर्थर रोड जेलमध्ये असतानाही अरमानं पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला ठाणे मध्यवर्ती कारगृहात हलवण्यात आलं होतं.