Thane Mumbra News:  ठाण्यातील मुंब्रा परिसरात (Thane Mumbra Crime) काल रात्री काही अज्ञातांनी एआयएमच्या कार्यालयाची तोडफोड करून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान मारहाण आणि तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 10 ते 12 जण हातात तलवार, काठ्या घेऊन कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. यात कार्यालयातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान याप्रकरणी कळव्यातील एमआयएम नेते सैफ पठाण यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


दोन सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद


एआयएमआयएमच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या दोन सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. पहिल्या सीसीटीव्हीमध्ये 10 ते 12 जण हातात तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन कार्यालयात घुसून तोडफोड करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती आतमध्ये धावत येताना दिसतेय. त्यानंतर त्याच्या मागे काही लोक येत असल्याचं दिसत आहे. कार्यालयात घुसुन त्या व्यक्तिला हे लोक मारहाण करत असल्याचं दिसत आहे. काही लोक मारहाण होत असलेल्या व्यक्तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे मात्र मारहाण करणारे कुणाचंही ऐकत नसल्याचं दिसून येत आहे.  


काही लोक आपल्या हत्येचा कट रचत आहेत, सैफ पठाण यांचा आरोप 


बिलाल काझी असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याला सध्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कळवा मुंब्रा विधानसभा AIMIM अध्यक्ष सैफ पठाण यांनी सांगितले की, रात्री 8.30 च्या सुमारास काही अज्ञात लोकांनी आमच्या कार्यालयाची तोडफोड केली. तिथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्राला मारहाण केली. काही लोक आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप सैफ पठाण यांनी केला आहे. त्यांनी याबाबत याआधीही माहिती दिली होती.  या घटनेनंतर सैफ पठाण यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


या घटनेमुळं मुंब्रा परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. सध्या इथं तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या