सोलापूर: चक्रीवादळात उडून गेलेला मुलगा झाडाच्या बेचकीत अडकून बचावल्याची थरारक घटना सोलापूरच्या सांगोला तालुक्यात घडली आहे. मंगेवाडी गावात रविवारी चक्रीवादळानं धुमाकूळ घातला. त्यावेळी डोरले यांच्या घरालाही त्या चक्रीवादळाचा तडाखा बसला. घरातल्या एका तुळईला बांधलेलया पाळण्यात श्रेयस हा 11 महिन्यांचा चिमुकला झोपला होता. पण वादळाच्या जोरदार वाऱ्यांनी त्याचा पाळणा छतासह उडून गेला.

 

वादळ थांबल्यानंतर श्रेयस आणि त्याचा पाळणा दिसेनासा झाल्यानं डोरले कुटुंबियांची घालमेल वाढली. आईने तर हातपाय गाळले. शोधाशोध सुरु झाली आणि तितक्यात घरापासून 60 फूट अंतरावर असलेल्या एका झाडाच्या बेचकीमध्ये अडकलेल्या त्या बाळाचा पाळणा दिसला.

 

कुटुंबीयातल्या एका सदस्यानं झाडावर चढून पाहिलं. तर आत पाळण्यात भेदरलेला श्रेयस धाय मोकलून रडत होता. श्रेयसला खाली घेतल्यानंतर तो सुरक्षित असल्याचं पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला.

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या आपत्तीला सामोरे गेल्यानंतरही श्रेयसला साधं खरचटलंही नाही. आपलं घर भुईसपाट झालेलं असलं, तरी आपला लाडका सुखरुप बचावल्याचा जास्त आनंद पालकांना होता.