Thane Ambernath News : अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना आक्रमक झाली आहे. मागणीची दखल न घेतल्यास 16 तारखेला नाट्यगृहाचे नामकरण स्वतः करु असा इशारा लहुजी शक्ती सेना व इतर सर्व बहुजन संघटना प्रमुखांनी सहमतीने दिला आहे. मागील अनेक महिन्यांपासून विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी पालिकेला वारंवार पत्र दिले आहे.
16 ऑक्टोबरला आम्हीच नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊ
स्थानिक आमदारांनीही जिल्हाधिकारी आणि पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन सादर केले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन 15 ऑक्टोंबरपर्यंत नामकरणाची घोषणा करा, अन्यथा 16 ऑक्टोबरला आम्हीच नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊ, असा इशारा दिला.
नामकरणाच्या मुद्द्यावर शहरात राजकीय आणि सामाजिक पातळीवर वातावरण तापले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जनतेच्या भावना आणि साहित्यिक वारशाचे प्रतीक आहेत. त्यामुळे नाट्यगृहासाठी हेच नाव सर्वात योग्य आहे. पालिका प्रशासनाने काही गटांना खूश करण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या भावनांचा सन्मान करून नाट्यगृहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे असे मत लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. या इशाऱ्यामुळे अंबरनाथ पालिका प्रशासनावर दबाव वाढला असून नामकरणाच्या मुद्द्यावर शहरात राजकीय आणि सामाजिक पातळीवर वातावरण तापले आहे. आता 15 तारखेपर्यंत प्रशासन निर्णय घेते का, की 16 तारखेला लहुजी शक्ती सेना स्वतः पुढाकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आक्रमक
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ भाऊ साबळे उपाध्यक्ष नामदेव भाऊ हावळे लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेश गायकवाड शहराध्यक्ष सोनू गायकवाड, तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष श्रीराम सोनवणे प्रकाश खंडागळे ,ज्ञानेश्वर मरसळे, श्रावण बनसोडे, अक्षय खरात, सतीश थोरात, सतीश मानवतकर, पवन ताकतोडे दिलीप बाविस्कर तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जानु मानकर, नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल आहीरे, किशोर आल्हाट प्रल्हाद कसबे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन 15 ऑक्टोंबरपर्यंत नामकरणाची घोषणा करा, अन्यथा 16 ऑक्टोबरला आम्हीच नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊ, असा इशाराही देण्यात आला आहे.