Neelam Gorhe : बंडाच्या एकवर्षानंतरही ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील संघर्ष कायम आहे. अजूनही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची कास धरली आहे. आज विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे यांना सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी नीलम गोऱ्हेंनी सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही, असं वक्तव्य केलं आहे. 


शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे." 


सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. आधी मनिषा कायंदे आणि त्यानंतर आता तुम्ही पक्षाची साथ सोडली, त्यामागे हेच कारण तर नाही? असं विचारल्यावर सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची परिस्थिती नाही, असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी अनुल्लेखानं सुषमा अंधारेंना टोला लगावला आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून नीलम गोऱ्हे नाराज? 


एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनापासूनच याची सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती. 


ठाकरेंकडून शिंदेंकडे इनकमिंग सुरूच 


बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.


त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Politics : ठाकरेंकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश