TET EXAM SCAM : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या दिवसापासून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्ण अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, टीईटी परीक्षेमध्ये आर्थिक गैरव्यवहार त्यासोबतच निकालाचा फेरफार झाल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होते, त्याच जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रीतिश देशमुख याला सुद्धा अटक केल्यानंतर या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला, त्याची संपूर्ण चौकशी शिक्षण विभागाने गठित केलेल्या समितीकडून केली जाणार आहे.
तुपे यांच्या निलबंणाचा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे काम पाहतील. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार 16 डिसेंबर 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून 48 तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोण आहेत तुकाराम सुपे?
तुकाराम सुपे मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी गावचे आहेत. गावात त्याकाळात शाळा नसताना शेजारच्या वाडा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ते पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले.
शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शिक्षण खात्यात रुजू झाले.
पण शिक्षण खात्यातील तुकाराम सुपेंची शिक्षण विभागातील कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिलीय . याआधी अनेकदा तुकाराम सुपेंवर कारवाईचा बडगा उगारला गेला. मात्र प्रत्येकवेळी ते नोकरीत परतून महत्वाच्या पदावर रुजू होण्यात यशस्वी ठरले .
2013 साली तुकाराम सुपे नाशिकचे शिक्षण उपसंचालक असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देऊन संस्था चालकांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर फोउजदारी गुन्हा नोंद झाला होता.
त्यानंतर सुपे पुण्यात दाखल झाले आणि 2014 साली पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. पण इथेही त्यांनी बाजारात शंभर रुपयांना मिळणारी कुंडी एकाच दुकानदारांकडून अकराशे रुपयांना खरेदी करण्याची सक्ती पुण्यातील शाळांना केली होती . त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सुपेंना पदावरून कार्यमुक्त केलं होतं.
खाजगी शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुपेंची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिली.
2016 साली सुपे पुण्यात एस एस सी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष म्हणून रुजू झाले.
एक जानेवारी 2018 ला त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले .
त्यानंतर सुपेंनी खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची कामे देण्याचा सपाटा लावला .
त्यातूनच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या ए जी टेक्नॉलॉजी कंपनीला त्यांनी ब्ल्याकलिस्टच्या यादीतून बाहेर काढले आणि जुलै 2020 मध्ये त्या कंपनीला टी ई टी ची परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले.