MP Dhairyasheel Mohite Patil: माढा तालुक्यातील कुर्डू येथे अजितदादांच्या फोनवरून झालेल्या वादंगावर आज (7 सप्टेंबर) माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार तोफ डागली. या गावात बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप केल्याने पुन्हा नवा वाद निर्माण होणार आहे. कुर्डू येथे मुरूम उपसा होत असताना महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी यावर कारवाई सुरू केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने थेट अजितदादांना फोन जोडून देत त्यांना अंजना कृष्णा यांना बोलण्यास दिले होते. यावेळी अजितदादांनी या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने देशभरातून दादांवर टीकेची झोड उठली होती. यानंतर दादांनी ट्विट करून आपला कोणाचाही अवमान करायचा किंवा बेकायदा कामाला पाठीशी घालण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, बाबा जगताप या पदाधिकाऱ्याच्या फोनवरून दादांनी महिला अधिकाऱ्यास धमकावले होते त्याचाच नशा करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला.
कुर्डू या गावची परिस्थिती तर बीडपेक्षा भयानक
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या सर्व प्रकारावर बोलताना कुर्डू गावची परिस्थिती तर बीडपेक्षा भयानक असल्याचा आरोप केला आहे. या गावात मुरूम माफियांची मोठ्या प्रमाणात दहशत असून सरकारी जागेतील व मुंबई पुण्याला जगायला गेलेल्या गोरगरीब आणि दलित शेतकऱ्यांच्या शेतातील कोट्यवधी रुपयाचा मुरूम या माफियांनी उचलल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केला. शासनाने वरिष्ठ पातळीवरून या संपूर्ण गावाची तपासणी केल्यावर हे भयानक वास्तव समोर येणार असून गावातील ग्रामस्थ किती दहशतीत आहेत हेही दिसेल असे सांगितले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाळू आणि मुरूम माफियांना सोडणार नसल्याची घोषणा केली होती. आता त्यांनी कुर्डू प्रकरणातील माफियांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
फोन बाबा जगतापचा नसून त्याने एका नेत्याला फोन केला
अजितदादांना जोडून दिलेला फोन बाबा जगतापचा नसून त्याने एका नेत्याला फोन करून अजितदादांना कॉन्फरन्स कॉलवर घेतल्याचा गौप्यस्फोट खासदार मोहिते पाटील यांनी केला. वास्तविक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसारखे वरिष्ठ कधीही थेट फोन न करता जिल्हाधिकारी अथवा पोलीस अधीक्षकांना बोलत असतात. मात्र फोन जोडून देणाऱ्या दुसऱ्या नेत्याने अजित दादांना थेट बोलण्यास भाग पाडल्याने त्यांना प्रोटोकॉल सोडून बोलावे लागल्याचेही मोहिते पाटील यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वर्तन करणे गरजेचे असताना अशा पद्धतीने फोनवर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
अतिशय चांगले काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यामागे सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून आता काही मंडळी या प्रामाणिक महिला अधिकाऱ्याच्या मागे विविध पद्धतीने चौकशीचा ससेमीरा लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून प्रामाणिक महिला अधिकाऱ्यास न्याय द्यावा अशी मागणी ही खासदार मोहिते पाटील यांनी केली. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डू प्रकरणात सनसनाटी आरोप केल्याने आता या प्रकरणात नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या