मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राणा दाम्पत्याच्या जामीनावर उद्या सुनावणी
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राणा दांपत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयपीसी कलम 124 A मध्ये दंडाधिकारी कोर्टाला जामीनाचे अधिकारच नसल्यानं तो मंगळवार सकाळपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात पहिल्याच सत्रात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. 


मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश  
औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेआधीच मनसे माजी जिल्हाध्यक्ष  सुहास दाशरथे यांचा मनसेला रामराम केला आहे. दाशरथे आज मुंबईत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. 


आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारानंतर ठाकरे दिल्लीत पोहोचतील. यावेळी राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री वळसे-पाटील आणि संजय राऊतांविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतरांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


सीबीएसई बोर्डाची परीक्षा 
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रे असतील. सुमारे 34 लाख मुले परीक्षेला बसले आहेत. (10वी आणि 12वी दोन्ही) दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर बारावीची परीक्षा 15 जूनपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 पर्यंत चालणार आहे.  


पंतप्रधान दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता 7 लोककल्याण मार्गावर 90 व्या शिवगिरी तीर्थयात्रा ब्राह्मो विद्यालयाच्या वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवाच्या वर्षभराच्या संयुक्त सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होतील.


डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा दुसरा दिवस
दिल्लीत 7 व्या रायसीना डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी मंक्षी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.  


काँग्रेसची बैठक 
आज सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक होणार असून त्यात काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते सुनील जाखर आणि केव्ही थॉमस कारवाईचा निर्णय घेणार आहेत.


कुमार विश्वास आणि अलका लांबा चौकशीला हजर राहणार
पंजाब पोलिसांनी आज आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास आणि अलका लांबा यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील 'प्रक्षोभक विधानां'बद्दल दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. 


लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आरोप निश्चितीवर सुनावणी
यूपीमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आज जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी होणार आहे.


संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार


संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत.


रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने 


आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (Royal challengers bangalore vs Rajsthan Royals) या दोन संघ मैदानात उतरणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघात सामना होईल.