सोलापूर : सोलापुरात मागील काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. मात्र आज, शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्यास तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल (गुरुवारी) संध्याकाळनंतर आज सकाळपर्यंत सोलापुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत 93 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी सायंकाळी 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1144 वर पोहोचला होता. आज सकाळी रुग्णाची वाढ न झाल्याने तीच आकडेवारी कायम राहिली आहे.


सोलापुरात आज सकाळपर्यंत एकूण 8304 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7162 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आढळले आहेत. तर 1144 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 99 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्ण हे वृद्ध आहेत तर कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी देखील ग्रस्त होते. समाधानाची बाब म्हणजे 484 रुग्ण हे योग्य उपचारामुळे बरे देखील झाले. त्यामुळे उर्वरित 561 रुग्णांवर सोलापुरातील विविध कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना आता होम आयसोलेशन : आयुक्त

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल मात्र कोणतेही लक्षणं नसतील तर अशा रुग्णांना आता घरीच राहून उपचार घेता येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. मात्र त्याला फारसा त्रास होत नसेल तर घरात राहून उपचार घेता येेणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ज्या घरात अशा पद्धतीने आयसोलेशन झालेल्या व्यक्तीच्या घराबाहेर लाल रंगाचे स्टीकर लावण्यात येईल. रुग्णाला काही त्रास जाणवला तर तात्काळ फोनद्वारे वैद्यकीय तज्ञांना बोलवता येणार आहे. चाचणीनंतर पाच दिवसांनी रुग्णाची पुन्हा तपासणी देखील केली जाणार आहे.  होम आयसोलेशन करण्यात येताना काही नियम आणि अटींची पुर्तता करणे देखील गरजेचे आहे. रुग्णासाठी घरात स्वतंत्र खोली आणि बाथरूम असणे गरजेचे असणार आहे. रुग्णाची देखभाल करण्यासाठी एखादा माणूस असायला हवा. इत्यादी नियमांची पुर्तता झाल्यास या प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.