रत्नागिरी : शांत आणि निर्मनुष्य रस्ते आणि सर्वत्र असणारा शुकशुकाट. हे सारं चित्र आहे निसर्ग सौदर्याने नटलेल्या आणि कायम गजबजलेल्या कोकणातील. या साऱ्याला कारणीभूत आहे तो कोरोना व्हायरस. कोरोनामुळे सध्या सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. शिवाय गणपतीपुळे आणि पावससारखी मंदिरं देखील पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून त्याचा परिणाम हा व्यवसायावर होताना दिसून येत आहे. कायम गजबजलेल्या समुद्री किनारी सध्या हाताचा बोटावर मोजता येतील एवढेच पर्यटक आहेत. मोठ्या व्यवसायिकांपासून ते छोट्या व्यवसायिकांवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता वर्षभराचं आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे. आता आम्ही कामगारांचे पगार तरी कसे द्यायचे? धंदाच नाही तर, तरणार तरी कसे? असा सवाल देखील सध्या व्यवसायिक देखील विचारत आहेत. त्यामुळे कोरोनाचं हे संकट आता आर्थिक गोष्टींवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम करताना दिसत आहे.
काय आहे सध्याची स्थिती?
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी गणपतीपुळ्यातील मंदिर मात्र बंद नव्हतं. पण, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंदिर प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर पावस आणि गणपतीपुळे येथील मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, त्यानंतर आता भाविकांची पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम हा छोट्या मोठ्या व्यवसायिकांवर झाला आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वच व्यवसायिकांना बसताना दिसत आहे. दरम्यान, मंदिर केव्हा सुरू होणार किंवा परिस्थिती केव्हा पूर्वपदावर येईल याबाबत कोणतीही माहिती नसल्याने यातून सावरायचं तरी कसं? असा प्रश्न देखील पडला आहे.
सर्वत्र शांतता
कोकण कायम गजबजलेलं असायचं. पर्यटकांची संख्या आणि राबता देखील तितकाच मोठ्या प्रमाणावर दिसून येत असे. पण, सध्या मात्र सर्वत्र शांतता दिसून येत आहे. शिवाय, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानक याठिकाणी देखील प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.