मुंबई : देशासह राज्यात रेकॉर्डब्रेक थंडीची लाट असताना नंदुरबारमध्ये पारा कमालीचा खाली गेला आहे. नंदुरबारमध्ये 5.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. डाब, तोरणमाळ, मोलगी या सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील ठिकाणांमध्येही थंडीचा कहर सुरु असल्याने या भागांवर धुक्याची दाट चादर पसरली आहे.
धुळ्यात पारा 4.4 अंश सेल्सियसवर घसरला आहे. त्यामुळे घरांबाहेर शेकोट्या पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे निफाडचा पारा तब्बल 6.8 अंशांवर गेला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. भल्या पहाटे द्राक्षघडांखाली शेकोटी लावून द्राक्षबागांचा बचाव सुरु आहे.
रेकॉर्डब्रेक थंडीमुळे निफाडचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर ऊस तोडणी कामगारांचे तांडेही गारठले आहेत. उत्तरेत हिमवृष्टी सुरु झाल्यावर त्याचा राज्याच्या तापमानावर परिणाम होत असतो. हिमालयाकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्याचं तापमान खाली जातं. मात्र सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये हे वारे अडवले जात असल्याने याठिकाणी थंडीचा चांगलाच कहर असतो.