लातूर : नोकरीसाठी अठरा लाख रुपये देऊनही वर्षभरातच मुलाची नोकरी गेल्यामुळे पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातुरात घडली. संस्थाचालकासह चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चाकूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील झरी (बु़) येथील शेतकरी सुधाकर सखाराम खंदारे यांच्या मुलास शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संजय दिगंबर आलापुरे, कमलाकर नारायण जायभाये, मिराबाई कमलाकर जायेभाये संभाजी मूकनर पाटील आणि संस्थाचालक तनिष्क कांबळे यांनी खंदारे यांच्याकडून नोकरीसाठी अठरा लाख रुपये उकळले होते.
विशेष म्हणजे शेती विकून तसेच उसनवारी करुन खंदारेंनी अठरा लाख रुपये या चौघांना दिले. त्यानंतर संस्थाचालक तनिष्क कांबळे यांच्या मुंबई येथील शाळेवर विनायक सुधाकर खंदारे यास शिक्षकाची नोकरी देण्यात आली. नोकरी सुरु होऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला तरी पगाराचा पत्ता नसल्याने खंदारे यांनी पगारासाठी विचारणा केली. त्यावेळी संस्थाचालकाने मुलाला तडकाफडकी
नोकरीवरुन काढून टाकलं.
एक वर्ष विनावेतन नोकरी केली़, नोकरीसाठी अठरा लाख रुपये मोजूनही पदरात काहीच पडले नाही़. नोकरीसाठी दिलेले अठरा लाख रुपये संस्थाचालकाकडे परत मागितले असता त्यांना धनादेश देण्यात आला, मात्र खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही. तेव्हा खंदारे यांनी या चौघांकडेही पैशासंबंधी विचारणा केली असता चेक परत द्या, पैसे रोख घ्या असे सांगण्यात आले.
नोकरीच्या नावावर या चौकडीने आपला विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा धक्का सुधाकर सखाराम खंदारे यांना बसला. त्यातून त्यांनी 28 डिसेंबर 2016 रोजी झरी (बु़) येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या फिर्यादीवरुन चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता पुढील तपास करत आहेत.