पैठणच्या तहसीलदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक, राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता सन्मान
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 29 Sep 2019 10:37 PM (IST)
तहसीलदार महेश सावंत यांनी तीस लाख रुपयांची लाच मागितली होती. शेतकऱ्यांकडून 30 लाखांच्या लाचेची डिमांड करुन एक लाख रुपये चक्क रविवारी तहसील कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
औरंगाबाद : राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श तहसीलदार पुरस्कार स्वीकारणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या तहसीलदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. महेश सावंत असं तहसीलदाराचे नाव आहे. नुकताच त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त झाला आहे. तहसीलदार सोबतच कैलास लिपने आणि बद्रीनाथ भवर या दोन खासगी इसमांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली कुळाची जमीन परत मिळावी म्हणून मुळ मालकाच्या नातेवाईकांनी आरोपी तहसीलदार पैठण यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये दाव्यामध्ये तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी आरोपी तहसीलदार महेश सावंत यांनी तीस लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना त्यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तहसीलदार महेश सावंत यांनी तीस लाख रुपयांची लाच मागितली होती. शेतकऱ्यांकडून 30 लाखांच्या लाचेची डिमांड करुन एक लाख रुपये चक्क रविवारी तहसील कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कार्यालयीन कामात शेतकऱ्यांची कामे न करता चक्क सुट्टीच्या दिवशी रविवारी कार्यालय चालू ठेवून लाच स्वीकारल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.