नागपूर : नागपुरात एटीएममधून अनोख्या पद्धतीने पैसे चोरणाऱ्या एका टोळीने बँकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. तब्बल 40 एटीएममधून या टोळीने आतापर्यंत तब्बल 50 लाखांची रक्कम लंपास केली आहे. ग्राहक बनून एटीएम विड्रॉल करायला आलेले हे टेक्नो चोर थक्क करणाऱ्या पद्धतीने चोरी करत आहेत.




काळ्या रंगाचं टी शर्ट घातलेला हा युवक सर्वात आधी आपल्या एटीम कार्डला स्वाईप करून एकाउंट बॅलन्स तपासतो. त्यानंतर विशिष्ट रकमेच्या विड्रॉलसाठी कमांड देतो. मशीन पैसे देण्यासाठीआपला काम सुरु करते आणि हे काय मगितलेली रक्कम ट्रेमध्ये येण्याच्या आधीच युवक आपल्या खिशातून एक किल्ली काढतो. एटीएमच्या वर असलेले लॉक उघडतो. एटीएमचा सायरन वाजू लागतो. मात्र, युवक लॉक उघडले, त्या जागेतून एटीएमचा मॉनिटर बाहेर खेचून आत मधली एक बटन दाबून एटीएम मशीनच बंद करतो. मॉनिटर पूर्ववत करतो आणि ट्रेच्या आत बोट घालून एकेक नोट बाहेर काढतो आणि रक्कम खिशात घालून आरामात बाहेर पडतो.

विड्रॉलसाठी टाकलेल्या रकमेचे ट्रांसेक्शन पूर्ण होण्याच्या आधीच हे महाभाग मशीन आतून बंद करतात आणि तोपर्यंत ट्रेपर्यंत रक्कम आलेली असते. ती बोटाच्या माध्यमाने काढून नेतात. या प्रक्रियेमुळे चोराच्या अकाऊंटमधून बॅलन्स कमी होत नाही आणि रक्कम चोराच्या हातात येऊन जाते.

धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत जवळपास 40 एटीएममध्ये असे प्रकार करून तब्बल 50 लाख रुपये लंपास केले आहे आणि फक्त एनसीआर कंपनीच्या मशीन्समध्येच हे प्रकार घडत आहे.

आता पोलिसांनी सर्व एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरु केले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. हे आरोपी एनसीआर मशीनची तांत्रिक बाबीची माहिती ठेवणारे असतील अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ज्या ज्या एटीएम मशीनमधून अशा प्रकारे चोरी झालेली आहे. ते सर्व एटीएम बंद करण्यात आले आहेत. मात्र चोर दर काही दिवसांनी नव्या ठिकाणी हात मारताना दिसत आहे. आता तर त्यानी नागपूरच्या बाहेरही अशा चोऱ्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं आहे.