अकोला: अकोल्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या गांधी रोडवरील शाखेत काल 5 लाखांची चोरी झाली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
विशेष म्हणजे चार जणांच्या टोळीनं ही चोरी सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग कामावर असताना अवघ्या 5 मिनिटांत केली.
सकाळी 11 च्या सुमारास 4 अनोळखी व्यक्ती बँकेत शिरले, त्यांच्यापैकी तिघांनी कर्मचाऱ्यांना बोलण्यात व्यस्त ठेवलं, तर एकाने थेट रोकड विभागात जाऊन हातसफाई करत 5 लाखांची कॅश लंपास केली.
हे सर्व होऊनही दिवसभर बँकेत व्यवहार सुरळीत सुरु होता, मात्र संध्याकाळी रोकड विभागाचे कर्मचारी कॅश मोजायला बसले, त्यावेळी चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पोलीसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चोरी झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.