मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग हे या महिन्याअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 150 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची मुख्य न्यायमूर्ती पदासाठीची निवड नक्की होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयातच मुख्य न्यायमूर्ती पदावर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असली तरी तांत्रिक दृष्ट्या हे शक्य नव्हतं आणि अल्प कालावधीसाठी बाहेरच्या राज्यात जाण्याची आपली तयारी नाही. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि काही वैयक्तिक कारणांसाठी आपण हा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एबीपी माझाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हल्ली लोकं आणि लोकप्रतिनिधी स्वत:च्या जबाबदा-या विसरू लागले आहेत. सारं काही कोर्टाच्या भरवशावर सोडू लागलेत, हे योग्य नाही, लोकांनीच प्रश्न विचारायला हवेत. मुंबई उच्च न्यायालय ही एक ऐतिहासिक संस्था आहे, ती आजवर कुणापुढेही झुकली नाही. त्यामुळे ही परंपरा यापुढेही जपली गेली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांच्या आमदारकीला राम शिंदेंचं आव्हान, पैसे वाटल्याचा, व्हॉट्सअॅपवर अपप्रचार केल्याचा आरोप
निवृत्तीनंतर आता बराचसा वेळ स्वत:साठी, कुटुंबियांसाठी आणि लिखाणासाठी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपले वडिल आणि ज्येष्ठ गांधीवादी व्यक्तिमत्व चंद्रशेखर धर्माधिकारी यांची आठवण काढताना सांगितलं की, ते आज असते तर चित्रचं वेगळं असतं. कदाचित ही वेळ आलीच नसती, आणि आज जरी ते असते तर ,'मी तुझ्या पाठीशी आहे', असंच म्हणाले असते असं त्यांनी सांगितलं. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं आहे.
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारींचा अल्प परिचय -
60 वर्षीय सत्यरंजन धर्माधिकारी यांनी बी. कॉम., एलएलबीचे शिक्षण पूर्ण करत 28 जून 1983 साली वकिलीला सुरुवात केली. 14 नोव्हेंबर 2003 साली मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नागरी समस्या, जनहित याचिका तसेच निवडणुकांसंदर्भातील याचिका हाताळताना त्यांनी नेहमीच आपली स्पष्ट आणि परखड मतं मांडली. हायकोर्टाशी संबंधित 16 समित्यांवरील सदस्यपद, 6 समित्यांचं अध्यक्षपद अशा अनेक जबाबदाऱ्या ते सांभाळत होते.
दाभोलकर - पानसरे हत्याकांड, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड, ठाणे मेट्रो, मुंबई-ठाण्यातील वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, पीएनबी बँक घोटाळा, निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणं यांसह अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुरू होती.