मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. शिवाय दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.


यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

निर्णयाचा या शिक्षकांना फायदा

राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गाजला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. ऑनलाईन बदल्यामुंळे अपंग, गंभीर आजार असलेले, पती - पत्नी एकत्रिकरण यासाठी फायदा होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

हागणदारीमुक्त महाराष्ट्र ही फक्त घोषणा?

दरम्यान, राज्याने हागणदारीमुक्त महाराष्ट्र झाल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याची टीका या घोषणेवर करण्यात आली. पण, ''हागणदारीमुक्त महाराष्ट्र याचा अर्थ आपण शब्दशः घेत आहोत. पूर्वी गावातील 500 लोक बाहेर शौचाला जात होते, आता केवळ एक ते दोन जण जातात हे यश आहे,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

''बाहेर जाणारे लोक आढळणार नाहीत असं नाही. मात्र पूर्वी 40 टक्केच शौचालये होती, आम्ही उर्वरित 60 टक्के बांधली. जी शौचालये बांधली ती वापरली जात नाहीत त्याबाबत बीडीओंना सूचना दिल्या जातील,'' असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

राज्यात 60 हजार शौचालये बांधायची आहेत. 2019 च्या शेवटपर्यंत बेसलाईन सर्व्हेनुसार जेवढी शौचालये बांधायची आहेत, तेवढी शौचालये राज्याने 2018 मध्येच बांधली आहेत, असा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.